Saturday, October 14, 2017

काही अन 'प्रोफेशनल' क्लायंट आणि फिल्म मेकिंग...




आजकाल मोबाईल फोन, आणि पूर्वीपेक्षा स्वस्त झालेल्या डिजिटल कॅमेरामुळे फिल्म बनवणं म्हणजे हातचा मळ, अशी लोकांची भावना होत चालली आहे.
मी कोणी मोठा फिल्ममेकर वगैरे नाही; पण आजवर जे काही काम केलंय, त्यावरून आलेले अनुभव अस्वस्थ करतात.
माझ्या दोन डॉक्युमेंटरी फिल्म्स नंतर अनेकांनी फिल्म बनवून द्याल का, याबाबत विचारणा केली. त्यातील बरेचजण फिल्मसाठी खर्च किती येतो आणि आपलं बजेट किती, याचा जराही विचार न करता थेट फिल्म बनवायलाच निघालेले...
अनेकांचा असा समज आहे की, घेतला कॅमेरा आणि निघाले शुटिंगला... कोणीही शुटिंग करू शकतो... नंतर जरा थोडं 'जोडकाम' (edit) केलं की, झाली फिल्म तयार...

एकदा एका गृहस्थाचा फोन आला...
- अरे, मला 10 मिनिटांची एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची आहे, किती खर्च येईल ते लगेच सांग. 
- म्हटलं, विषय काय आहे ? लोकेशन काय असतील ? स्क्रीप्ट कशी आहे ? किती दिवस लागतील ? या आणि अशा अनेक गोष्टी बघून ठरवायला लागेल. 
- ते मला माहीत नाही, तू आकडा सांग...
- आहो, असा कसा सांगू ?
खूपच मागे लागले, म्हणून काही लाखात अंदाजे आकडा सांगितला. ते उसळलेच...
- असं कसं ? एवढा कधी खर्च येतो का ? 
- मग किती खर्च येतो ? तुम्हीच सांगा. आणि तुम्हाला आकडाच हवाय ना... मग मी दोन तासांच्या मराठी फिल्मला जेवढा खर्च येतो, त्यानुसार 10 मिनिटांच्या फिल्मचा हिशोब दिला... घ्या...
फोनच ठेऊन दिला ना राव... 

एक भक्त भेटलेला...
भक्त म्हणजे, कोणत्या तरी गुरुचा हो... 
तर त्याला त्याच्या गुरूंच्या वाढदिवशी त्यांच्या कार्यावर फिल्म बनवून अर्पण करायची होती. छान कल्पना...
- म्हटलं, खर्च करायची तयारी आहे ना ? 
- हो हो... आहो गुरुमाऊलींमुळेच मी आज एवढा मोठा झालोय...
त्यांच्या काय काय requirements आहेत, त्या समजून घेतल्या... कसं, कधी, काय करायचं ते ठरवलं. त्यानुसार workout करून मी त्यांना कोटेशन मेल केलं.
भक्ताचा फोन आला.
- म्हणाले, बाबांना (वडील) दाखवलं कोटेशन... नको म्हणतायत... 
- काय झालं, कशासाठी नको म्हणतायत ?
- काही सांगितलं नाही; पण त्यांनी एकदा नाही म्हटलं की, त्यावर आम्ही काही बोलत नसतो.
- ठीक आहे तुम्ही नका बोलू. मी बोलतो. नंबर द्या त्यांचा.
- नाही नाही, नको नको... फोनच ठेवला...

एक बाप - बेटे एक कन्सल्टन्सी चालवतात...
एकदा त्यांनी बोलवलं. म्हणाले,
- माझ्या मुलाची एक वेबसिरिज सारखी YouTube वर लेक्चर सिरीज करायची आहे. एकदम अर्जंट... 15 मिनिटांचं एक लेक्चर. दोन अँगल कॅमेरा वगैरे वगैरे... खूप लेक्चर्स आहेत. 
भली मोठी लेक्चर्सची यादी दिली. साधारणपणे एकूण 150 लेक्चर्स होते.
- 12 तासांचं सलग शेड्यूल लावा. चार दिवसात संपवू. 
म्हणजे दिवसाला जवळजवळ 35 लेक्चर्स...
तो मुलगा शेजारीच बसलेला. त्याला आलं ना टेन्शन... तो म्हणाला,
- बाबा, कॉलेजमध्येपण एवढा वेळ मी सलग लेक्चर देत नाही.
- तू काळजी नको करू बेटा. बाजूला डॉक्टरांना बसवू. काही वाटलं, तर ऍडमिट करू; पण चार दिवसांत संपवायचंच.
- मी म्हटलं, त्यांचं बरोबर आहे. 12 तास सलग लेक्चर देऊन घशाची वाट लागेल त्यांच्या. आपण ट्रायल घेऊ चार तासांची. मग ठरवू कसं शेड्यूल लावायचं ते. 
- अजिबात नाही. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही. उगाच शेड्यूल कमी लावून, दिवस वाढवून भाडं वाढवू नका. 12 तास शुटिंग करायला तुम्हाला जमणारे का बोला . 
- मी म्हटलं, आम्हाला न जमायला काय झालं, करू आम्ही. मुलाचा विचार करा. 
- त्याचा काय विचार करायचा ते मी बघतो. त्या त्या दिवशी शूटिंग झालं की, रात्रभरात एडिट करा. दुसऱ्या दिवशी मी ते सगळं बघून फायनल करीन. तुम्ही याचं एकीकडे शुटिंग करत राहा.
- म्हटलं, कसं शक्य आहे, 12 तासात जास्तीत जास्त शूटिंग करून, प्रत्येक लेक्चरची फाईल वेगवेगळी एडिट, एक्स्पोर्ट करायला वेळ लागतो. 
दोन अँगल म्हणजे व्हॉईस sync वगैरे बऱ्याच गोष्टी समजावल्या. कशीबशी एडिटला मुदतवाढ दिली. मी कोटेशन दिलं. एडिटिंगसाठी जास्त खर्च येत होता. त्यात मध्येमध्ये स्लाईड्स, फोटो, व्हिडीओ आणि अर्जंट यामुळे बजेट वाढलेलं. ते आकडे बघून बाप उखडलाच. 
- हे असले काय रेट असतात का ? वाट्टेल ते सांगू नका. मी अमुक रुपयांच्या वर एक दमडीही देणार नाही.
आणि त्याने सांगितलेल्या दमड्यांमध्ये काहीच होणं शक्य नव्हतं. तो बाप समजावण्या पलीकडचा होता. मुलगा नाराज, हताश झालेला. अर्थातच काम झालं नाहीच.

एका संस्थेचा किस्सा...
माझे एक अत्यंत जवळचे, जिवाभावाचे स्नेही एका संस्थेचं काम घेऊन आले. सोबत एक उद्योगपती, जे त्या संस्थेचे पदाधिकारीही होते...
- म्हणाले, संस्थेचा वर्धापन दिन आहे, तर संस्थेच्या गेल्या अनेक वर्षांच्या कार्याविषयी 10 मिनिटांची फिल्म बनवायची आहे. संस्थेचं कार्य खूप मोठं आहे... संपूर्ण राज्यभर कार्य सुरू आहे. अनेक मोठे उद्योगपती, आमदार, खासदार संस्थेत उच्च पदांवर आहेत... संस्थेने हे केलंय, ते केलंय, ही बिल्डिंग बांधलीये, हे संस्थेचं अद्ययावत ऑफिस... वगैरे वगैरे...
आम्ही पाहत - ऐकत होतो...
सगळं बघितलं, काम खूप छान आणि मोठं होतं... 
डेड लाईन विचारली. 
- येत्या रविवारी संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्यात दाखवायची आहे. 
- म्हटलं, आज गुरुवार. या आधी काही शुटिंग केलंय का, संस्थेच्या कार्याचं ?
- नाही. सगळंच शुटिंग करायचंय. यांव करू, त्यांव करू... क्रेन, जिमी जीब, ड्रोन काय हवं ते वापरू... अगदी मस्त प्रोफेशनल झालं पाहिजे... आज सुद्धा संस्थेचा मासिक कार्यक्रम आहे, त्याचंही शुटिंग करायचंय.
- म्हटलं, वेळ अगदीच कमी आहे. त्यात राज्यातल्या सगळ्या कामाचं शुटिंग करायचंय, स्क्रिप्ट, रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि बाकी प्रोसेस... घाईघाईत 2 दिवसांत होणं अवघड आहे. 
- असं कसं, तो अमुक डायरेक्टर एक महिन्यात एक आख्खी फिल्म तयार करतो, मग 10 मिनिटांची फिल्म तुम्ही 2 दिवसांत नाही पूर्ण करू शकत ?
- अहो, वेगवेगळे लोकेशन्स, मुलाखती आणि इतर सगळं शुटिंग, स्क्रिप्ट...
- माझं वाक्य अर्धवट तोडत म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, स्क्रिप्ट - तो अमुक लिहील. आपला मित्र आहे, व्हॉईसओव्हर - तो तमुक करेल. आपला मेंबर आहे, एडिटिंग - अमका करेल. माझा भाऊ आहे... 
- मग आम्ही काय करू ?
- तुम्ही फिल्म बनवा... चला लवकर सुरुवात करा, आजचं शुटिंगपण करायचंय.
- अहो, रेट तर ठरू देत... Workout करायला लागेल... मी कोटेशन मेल करतो तुम्हाला...
त्यावर लगेच यांव करू, त्यांव करू म्हणणाऱ्या त्या वाघाची मांजर झाली. (या वाघाचा कुठल्याही प्राण्या - पक्षाशी संबंध नाही)
- म्हणाले, कसं आहे, ही चॅरिटेबल संस्था आहे. तुम्ही चार पैसे कमवाल, त्याऐवजी दोनच पैसे कमवा... पण काम कसं एकदम प्रोफेशनल आणि अर्जंट हवं...
मी त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमाचं शुटिंग केलं. रात्री 10 मिनिटांच्या फिल्मचं कोटेशन मेल केलं.
केवळ माझ्या जवळच्या स्नेह्यांसाठी कोटेशनमध्ये रेट्स अगदी व्यवस्थित लावलेले. म्हणजे, चार पैसे कमवायच्या ऐवजी, खरंच दोनच पैसे मिळतील असं. अर्जंटचा वेगळा रेटसुद्धा नाही लावला. हे सर्व माझ्या जिवलग स्नेह्यांसाठीच...
स्नेह्यांना आणि त्या उद्योजक पदाधिकाऱ्याला मेल पाठवल्याचं फोन करून कळवलं. ठीक आहे, बघतो म्हणाले. त्यानंतर दोन दिवस झाले, कळवलं नाहीच. प्रोफेशनलपणाच्या गप्पा मारणाऱ्यांचा कुठे गेला प्रोफेशनलपणा ??? साधं हो किंवा नाही हेसुद्धा कळवता नाही येत ???
स्नेह्यांकडे विषय काढला, तर त्या 'जवळच्या' स्नेह्यांनी विषयच बदलला. तो पदाधिकारीसुद्धा आता कधी समोर आला, तर नजर चुकवायचा प्रयत्न करतो किंवा नुसतं hi म्हणून कल्टी मारतो.
काय झालं कोणास ठाऊक...
एक गोष्ट मात्र झाली, माझी त्या स्नेह्यांशी पूर्वीपेक्षा जास्त दृढ मैत्री झाली... माझ्यासाठी काय वाट्टेल ते करतात. 'त्या' संस्थेच्या कार्यक्रमांना ते आवर्जून बोलावतात, मी ही केवळ त्यांच्यासाठीच अनेकदा कार्यक्रमांना हजेरीही लावतो...
डॉक्युमेंटरी, कॉर्पोरेट फिल्म, advt फिल्म बनवणं हे स्वस्त आणि सोपं काम वाटत असल्यासारखे बडबडत असतात. कोणतीही फिल्म घेतला कॅमेरा आणि बनवली, असं होत नसतं... त्यामागे प्रचंड मेहनत आणि विषयाचा सखोल अभ्यास असतो. त्याचबरोबर ती लोकांना कंटाळवाणीसुद्धा वाटता कामा नये... हे यांच्या ध्यानात यायला हवं...
असो, तर असे हे क्लायंट प्रत्येकालाच थोड्या बहुत फरकाने भेटत असतीलच...

- धनंजय वसंत मेहेंदळे
(मेहेंदळे मोशन पिक्चर्स, पुणे)
E Mail : movies.mehendale@gmail.com

6 comments:

  1. खूप छान अनुभव सांगितलास,तुझ्या patience ची कमाल आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... कमाल कसली... उलट थोडा पेशन्स वाढलाय ;-)

      Delete
  2. मस्त लिहीलय काका.

    ReplyDelete
    Replies
    1. काका ??? ;-) पण मनःपूर्वक धन्यवाद...!!!

      Delete
  3. खूपच छान लिहीलय.या निमित्ताने लोकांच्या स्वभावाचे विविध पैलू बघायला मिळत असतील.स्पष्टवक्तेपणा अशा वेळी उपयोगी पडतो.धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद सर...!!!

      Delete