Friday, June 9, 2023

आमचे गुरू : डॉ. अरविंद संगमनेरकर

आमचे गुरू : डॉ. अरविंद संगमनेरकर

- धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे




रविवार, दि. 4 जून 2023 रोजी पुण्यातील नामवंत ज्येष्ठ स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ; तसंच 'शतायुषी' या आरोग्यविषयक दिवाळी अंकाचे संपादक डॉ. अरविंद संगमनेरकर (माझे आणि माझी पत्नी डॉ. मीनलचे गुरु) यांचं सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या काही आठवणी...

साधारणपणे २०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट... माझ्या उमेदवारीच्या काळात पेपरमधील जाहिरात पाहून 'शतायुषी' अंकासाठी नोकरीकरिता अर्ज केला.

सिलेक्ट झालो. तेव्हापासूनच 'शतायुषी' परिवाराशी नाळ जुळू लागली. पुढे तिथे एक employee म्हणून न राहता 'शतायुषी' आणि संगमनेरकर परिवाराचा सदस्य झालो.

सरांसह सर्वांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं, सांभाळलं. पुण्यात माझं एक हक्काचं घरच झालं म्हणा ना.

हे सगळं घडलं ते डॉ. अरविंद संगमनेरकर म्हणजे आमचे मोठे सर आणि त्यांच्या पत्नी डॉ. आशा वहिनी यांच्यामुळे.

पांढरा शुभ्र सफारी, त्यावर एम्ब्रॉयडरी केलेलं छोटंसं गुलाबाचं फुल. हात पाठीमागे बांधून ताठ चालणं, माणसांमध्ये रमणं म्हणजे मोठे सर...

'शतायुषी' दिवाळी अंकाची गडबड साधारणपणे 2, 3 महिने आधी सुरू व्हायची. तेव्हा रात्री जेवण झाल्यावर 10 वाजल्यापासून उशिरापर्यंत जागून मी आणि मोठे सर त्यांचे अंकातील लेख तयार करत बसायचो. तसं पाहिलं तर, लेखाचं काम साधारण तासाभराचं असेल; पण आमच्या अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. कौटुंबिक, संगीत, साहित्य, नाटक... अशा अनेक... 

असंच सरांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनबाबत व्हायचं. सरांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानं व्हायची. केवळ मेडिकलच्या विषयावरच नाही तर, विविध विषयांवर... त्या स्लाईड्स करण्याचं काम माझ्याचकडे असायचं. ते कामही रात्री उशिरापर्यंत चालायचं.

अंकाचे लेख, स्लाईड्स करतांना सर त्यात असंख्य बदल करायचे. सारखे सारखे बदल करून मी वैतागायचो. चिडचिड व्हायची. कधीकधी सरांचे आणि माझे त्यावरून किरकोळ वादही व्हायचे. पण मजा यायची; कारण आमच्यात जनरेशन गॅप खूप असल्यामुळे आमचे एकमेकांचे विचार क्वचित कधीतरी 'पटायचे नाहीत'. मात्र हळूहळू मी त्यांच्या विचारांशी जुळवून घ्यायला शिकलो. त्यातून मला एक कळलं की, सर उगाच सारखे बदल करत नाहीत. जे काही (लेख,स्लाईड्स) तयार होईल, ते एकदम perfect आणि उत्तमच असलं पाहिजे. कामात Perfectionist राहण्याची थोडीफार सवय लागली ती सरांमुळेच...

माझ्या एका मोठ्या वाईट काळात माझा परिवार, मित्रमंडळी यांच्याप्रमाणेच मला ज्यांनी जपलं, ते मोठे सर, वहिनी, संगमनेरकर व दारव्हेकर परिवार, शतायुषी व संपूर्ण कॉलनी नर्सिंग होमचा स्टाफ आणि डॉक्टर्स या सर्वांनी. या काळात मला मित्रांप्रमाणेच सरांनी मला अजिबात एकटं पडू दिलं नाही. शारीरिक, मानसिक आणि वेळप्रसंगी आर्थिक बाबतीतही माझे भक्कम आधार झाले.

या काळात आणि पुढे कायमच सर मला त्यांच्याबरोबर नेहमी प्रवासाला, व्याख्यानांना न्यायचे. बरेचदा व्याख्यानांच्या वेळी मीच त्यांच्या स्लाईड्स स्क्रीनवर दाखवायचो. सरांच्या पत्नी डॉ. आशा वहिनी गमतीत म्हणायच्या की, "एकेका प्रेझेंटेशनवर हे दोघं इतकं काम करतात की, कधी सर नसले तर, धनंजयच सरांच्या ऐवजी व्याख्यान देऊन येईल. इतकं ते त्याच्याही डोक्यात फिट्ट बसलंय."

सरांबरोबर महाराष्ट्रात खूप प्रवास केला. त्या प्रवासातही आमच्यात अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. "सध्या नवीन काय वाचतोय? अमुक पुस्तक वाच." माझ्याकडे ते पुस्तक नसेल तर, त्यांच्याकडील पुस्तक द्यायचे. मग पुढच्या ट्रीपमध्ये त्या वाचलेल्या पुस्तकावर चर्चा... वाचनाबरोबरच गाणं कसं ऐकावं, कोणतं ऐकावं वगैरे छान पद्धतीने सांगत. त्याचबरोबर लेखनासाठीही उत्तेजन देत होते. लिहितांना बोली भाषेत कसं लिहावं, वगैरे वगैरे अनेक विषयांवर गप्पा... कधी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अर्थासह समजवायचे. त्यामुळे त्यावेळी माझ्याही काही ओव्या पाठ झाल्या होत्या. त्याचबरोबर ते त्यांच्या आयुष्यातले किस्से सांगत. त्यामुळे प्रत्येक प्रवास म्हणजे मैफिल असायची. त्यात सोबत त्यांचे बंधू डॉ. शरद काका असले की, गप्पांना आणखीनच रंगत यायची... 

सरांमुळे मला चांगलं वाचण्याची, चांगलं ऐकण्याची आणि चांगलं लिहिण्याची गोडी, सवय लागली... मला मोठे सर खऱ्या अर्थाने गुरू म्हणून लाभले... 

एकदा सरांचं खंडाळ्याला लेक्चर होतं. मी तेव्हा बदलापूरच्या आमच्या घरी होतो. सर, शरद काका बदलापूरच्या घरी आले. माझ्या वहिनीने केलेल्या पाहुणचाराने इतके खूष झाले की, नंतर अनेक दिवस कौतुक करत होते. बदलापूरहून जवळ असलेल्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात आम्ही गेलो. शरद काकांना प्राचीन गोष्टींमध्ये रस असल्याने त्यांना ते बघायचं होतं. मग माथेरान. तिथे घोड्यावरून फिरणं... धमाल...

पुढे मला नोकरीच्या वेगवेगळ्या संधी मिळत गेल्या; पण सरांनी मला शतायुषी सोडून जाण्यासाठी कधी आडकाठी केली नाही. उलट सतत प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे माझी त्या परिवाराशी नाळ कधी तुटलीच नाही. 

माझी पत्नी डॉ. मीनल तिथेच माझ्या आयुष्यात आली आणि माझी अर्धांगी झाली. आमचं प्रेम प्रकरण एकदा सरांच्या कानावर गेलं. सरांनी आम्हा दोघांना बोलावलं. प्रेमळ स्वरात विचारलं, "काय प्रेम बिम करताय का ?" आम्हाला सरांच्या या प्रश्नाची गंम्मत वाटली. आम्हा दोघांना वडीलकीच्या नात्याने प्रेमाने आणि काळजीपोटी काही प्रश्न विचारले. त्यांना जेव्हा खात्री पटली, तेव्हाच त्यांनी आमच्या नात्याला आनंदाने होकार दिला. 

मी केवळ ग्रॅज्युएट न राहता आणखीही पुढे शिकावं, असं सरांना सतत वाटत असे. म्हणायचे, "वाटल्यास मी तुला गाईड करतो. तुला ऍडमिशन घेऊन देतो." पण एकदा कमवायला लागल्यावर मला पुढे शिकण्यात फार काही स्वारस्य राहिलं नव्हतं; मात्र या सर्व काळात सरांनी केलेला support खूप महत्त्वाचा होता. 

लग्नानंतर मी मीनलच्या भक्कम पाठिंब्यामुळे  डॉक्युमेंटरी फिल्म्सचा उद्योग सुरू केला. या कामामुळे माझा विविध विषयांवर अभ्यास होत गेला. सर तेव्हा खूप खूष झाले होते. "डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने का होईना, मुलगा पुन्हा अभ्यासाला लागला."

माझ्या पहिल्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या कामाला सुरुवात करतांना, मला कळत नव्हतं की कशी सुरुवात करावी, कोणाला भेटावं... मी सरांकडे गेलो. साहित्य, संगीत, शिक्षण सर्वच क्षेत्रात सरांचं मोठं स्थान होतं. साहित्य परिषदेसह विविध शैक्षणिक व अनेक संस्थांवर उच्च पदावर होते. सतत माणसांच्या गराड्यात असायचे. त्यामुळे सरांनी लगेच, तू अमुक अमुक यांना भेट, ते तुला सर्व मदत करतील वगैरे सांगून, लगेच त्या- त्या व्यक्तींशी बोलून मला त्यांच्याकडे पाठवलं. आणि कामाला दिशा मिळाली.

आमच्या लग्नानंतर सर, वहिनी आमच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमाला, माझ्या प्रत्येक फिल्मच्या स्क्रिनिंगला हजर असायचे.

नंतर अधूनमधून आमच्या भेटी व्हायच्या. 

दरवर्षी न चुकता वाढदिवसाला सर फोन करून शुभेच्छा द्यायचे. रात्री कितीही उशीर झाला तरी सरांचा फोन यायचाच. सरांचा फोन आल्यावरच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाल्यासारखं वाटायचं.

काही वर्षांनी सरांच्या बहीण - मंगला दारव्हेकर वारल्या. नंतर सरांचे जिवाभावाच्या मित्रासारखे सावली सारखे राहिलेले त्यांचे धाकटे बंधू शरद काका गेले आणि सर थोडे खचल्यासारखे वाटले. तरी सर वयाच्या 80व्या वर्षीही कामात व्यग्र होते.

नंतर कोरोना आला... आणि सदैव माणसांच्या गराड्यात राहणारे सर एकाकी झाले. त्यांचं वय लक्षात घेता कोरोनामुळे कोणालाच त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नव्हतं; पण फोनवर बोलणं व्हायचं. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर सरांना भेटायला गेलो आणि तिथेच स्तब्ध झालो. ते पूर्वीचे सर नव्हते... ज्या थाटात, डौलात राहणारे सर बघितले होते, ते हे नव्हते... त्यांच्याकडे पहावलं नाही... इथे ते लिहू शकत नाही...

नंतर हॉस्पिटलमध्ये bed ridden झालेले सर...

आणि आता सर गेले... माझा आणि माझ्या पत्नीचा मोठा आधार गेल्यासारखं वाटलं.

सरांना भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏


Thursday, August 12, 2021

बाबासाहेब, स्कूटी आणि मी...

बाबासाहेब, स्कूटी आणि मी...

 


आज 'पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे' यांचा तिथीनुसार (नागपंचमी) वाढदिवस. सर्वप्रथम त्यांना 99व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

बाबासाहेबांशी आमच्या घराचे ऋणानुबंध जुळले तेआमच्या परिवाराचे अत्यंत जवळचे स्नेही अंबरनाथचे स्व. श्री. सुभाषराव खडकबाण उर्फ भाऊ यांच्यामुळे. माझे वडील ज्येष्ठ पत्रकारसंपादक स्व. श्री. वसंतराव मेहेंदळेहे त्यावेळी ठाणे जिल्ह्यातून 'साप्ताहिक शिवगर्जनाहे वृत्तपत्र प्रकाशित करायचे. 

त्याही आधी माझे वडील 'योगेशनावाने मासिक प्रकाशित करायचे. बाबासाहेबांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नांतून १९७४ साली मुंबईत शिवतीर्थावर भव्य 'शिवसृष्टीउभी राहिली होती. त्याच्या विशेषांकाचं प्रकाशन मा. श्री. बाबासाहेबांच्या हस्ते झालं होतं.

त्यानंतर ठाण्याचे प्रथम नगराध्यक्ष श्री. वसंतराव मराठे यांनी माझ्या वडिलांकडे 'सा. शिवगर्जना' या अंकाची जबाबदारी सोपवली.

वडील असतांना त्यांच्या विनंतीवरून सा. शिवगर्जनाच्या अनेक दिवाळी अंकांसाठी बाबासाहेबांनी कथा प्रसिद्ध करण्यासाठी दिल्या होत्या. 

माझे वडील होतेतेव्हा बाबासाहेब आमच्या बदलापूरच्या घरी दोनवेळा आले होते. त्यातली एक भेट आठवते. एकदा बदलापुरात बाबासाहेबांची व्याख्यानमाला होती. माझे मोठे बंधू श्री. गजानन मेहेंदळे आणि मी त्याला हजेरी लावायचो. माझ्या वडीलांचं त्यावेळी एक ऑपरेशन झाल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. शेवटच्या दिवशी व्याख्यान संपल्यावर मी आणि दादा बाबासाहेबांना जाऊन भेटलो. त्यांनी दादाजवळ वसंतराव का आले नाहीयाबद्दल चौकशी केली. नंतर थोडं बोलणं झाल्यावर आम्ही निघालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला जायच्या आधी ते आमच्या घरी आले. आम्ही राहायचो ती जुनी इनामदार वाडी... 'राजा शिवछत्रपतीलिहिलेली एक मोठी मॅटॅडोर गाडी वाडीत आली. वाडीतले चाळकरी कुतुहलाने बघू लागले. वाडीतलं कोणीतरी "तुमच्याकडे बाबासाहेब आले" म्हणून सांगायला आले. आमची धावपळ सुरू झाली. आम्हाला अनपेक्षित असा सुखद धक्का होता. गाडीतून बाबासाहेब उतरले. घरी आले. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस झाली. गप्पाचहा पाणी झाल्यावर जेव्हा बाबासाहेब परत जायला निघालेतेव्हा बाबासाहेबांना बघण्यासाठी मोठी गर्दी बाहेर जमली होती. ते परत जातांना दोन्ही बाजूला खूप लोकं उभी होती. मला त्यावेळी त्या वलयाचं खूप आकर्षण वाटलं होतं.

मी पुण्यात स्थायिक झाल्यावर बाबसाहेबांशी अनेकवेळा भेट झाली/ होते. कधी मनमोकळीतर कधी ओझरती... जाणता राजाव्याख्यानांना आणि वैयक्तिकही अनेकवेळा.

पर्वतीजवळ सहकारनगरमध्ये राहात असतांनायेण्या जाण्याच्या वाटेवर बाबासाहेबांचं घर... त्यामुळे दार उघडं असेल आणि समोर बाबासाहेब दिसले कीभेटायला जायचो. 


सकाळी लवकर गेलो, तर बाबासाहेब दाराजवळ खुर्चीमध्ये लुंगी आणि बंडी घालून पेपर वाचत बसलेले असायचे.  

"या या..." म्हणत पेपर बाजूला ठेवायचे. कधी चहा मागवायचे. बरेचदा गप्पांचा मूड असायचातर कधी आपणच त्यांना काहीतरी विचारून बोलतं करायचं. मग त्यांच्या पोतडीतून वेगवेगळे किस्से बाहेर निघायचे. अगदी महाराजांबद्दलच असं नाहीतर चालू घडामोडीकिंवा अन्य काही... कधी ते स्वतःच्याच विचारात - चिंतनात मग्न असायचे.


नंतर काही कारणांमुळे बाबासाहेबांना येताजाता सहज भेटता येत नव्हतं. मग प्रतापरावांना फोन करूनबाबासाहेबांच्या प्रकृती आणि वेळेनुसारकिंवा कधी भाऊ खडकबाण यांच्यामुळे भेट व्हायची.


बाबासाहेबांना अगदी जवळून अनुभवण्यापूर्वी मला वाटायचं कीते म्हणजे गंभीर व्यक्तिमत्वफक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दलच बोलणारेअसं वाटायचं... पण मी पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांच्याशी भेट होऊ लागली आणि हा गैरसमज दूर झाला. एकदा मी, माझी पत्नी डॉ. मीनल आणि मेव्हणे डॉ. रोहित - आम्ही 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सिनेमा बघायला गेलो होतो. तिथे बाबासाहेबही सिनेमा बघायला आले होते.

हळूहळू त्यांच्या आवडी निवडी कळत गेल्या. त्यातून कळलेली त्यांची एक आवड म्हणजे सोनचाफ्याची फुलं... योगायोगाने मलाही सोनचाफ्याची फुलं आवडतात. मग काय, एरवी मी त्यांच्या वाढदिवसाला एखादं छान फुलाचं रोप घेऊन जायचो, त्याऐवजी ही फुलं घेऊन जायला लागलो.

एकदा सकाळी मी त्यांच्याकडे गेलो. नमस्कार केला. त्या दिवशी त्यांच्या घरात आतमध्ये मोठ्या ड्रममध्ये जुन्या गंजलेल्या तलवारीदांडपट्टा अशी अनेक शस्त्रे ठेवली होती. म्हटलं, "बाबासाहेब हे काय ?"

"थोडं थांबा. सांगतो." असं म्हणून आत गेले. एक डबा आणला. तो उघडून माझ्यासमोर धरला. आत बेसनाचे लाडू... म्हणाले, "घ्या..." मी संकोचलो थोडा. पुन्हा आग्रह केला. मी एक लाडू घेतला. 

"तर म्हणालेतुम्हाला हात किती आहेत ?" 

"आहो बाबासाहेब खरंच नको..."

घ्या ते दोन्ही हात भरून..."

तरी मी एकच घेतला. आग्रह करून दुसरा घ्यायला लावला. मग लहान बाळासारखा दोन मुठीत दोन लाडू घेऊन खात बसलो.

ते झाल्यावर म्हणाले, "चलाहे काय चाललंयते दाखवतो. चप्पल घालूनच आत या. पायात रुपेल काहीतरी..." मी त्यांच्या मागोमाग आत गेलो. कुठल्यातरी ठिकाणी त्यांना जुनीअत्यंत दुर्मीळ शस्त्र मिळाली. शिवकालीन ठेवा... ती शस्त्र अत्यंत गंजलेल्या अवस्थेत होती. त्या ड्रममध्ये अॅिसड की काहीतरी होतं, त्यात ठेवली होतीगंज साफ करायला... ज्या तलवारी साफ झालेल्या, त्या एकेक करून हातात देत दाखवत होते. त्यांची माहिती देत होते. एक दणकट तलवार त्यांनी काढली. अत्यंत जड... मला म्हणाले, "घ्याउचला ती तलवार." ती तलवार बघूनच माझे डोळे विस्फारले गेले. मनात म्हटलं, 'आत्ता ही जर का आपल्याला उचलता आली नाहीतर काही खरं नाही.सगळी शक्ती एकवटली आणि तलवार उचलली. बाबासाहेबांनी टाळी वाजवली आणि चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत म्हणाले, "मगाशी तुम्ही जे दोन लाडू खाल्ले नात्याचा हा चमत्कार." मनमुराद हसलो. 

त्यावेळी मला माझ्या लहानपणीची त्यांच्याबरोबरच्या भेटीची आठवण झाली. त्यांना ती सांगितली. सहावी-सातवीत असेन मी तेव्हा. आई वडिलांबरोबर पहिल्यांदा बाबासाहेबांकडे आलो होतो. दिवाळीच्या सुमारास. वर उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा असलेला त्या वर्षीचा दिवाळी अंक देण्यासाठी आम्ही आलो होतो. तेव्हाही अशीच एक जड तलवार मी उचलली होती. त्यावेळी एका तबकातून कोणीतरी ती तलवार बाबासाहेबांसमोर आणली. मला म्हणाले, "बाळराजेउचला ही तलवार." मी घाबरलोकारण ती तलवार दिसायलाच एवढी भरभक्कम होतीतर उचलायला किती जड असेल... वडील म्हणाले, "जा उचल. जमेल तुला." वडिलांनी धीर दिल्यावर उठलो आणि क्षणात ती तबकातली तलवार उचलून वर धरली. बाबासाहेबांनी लगेच "शाब्बास राजे!" म्हणून पाठ थोपटली. त्यांनी एकाला बोलवून काहीतरी सांगितलं. थोड्याच वेळात ते गृहस्थ एक मोठं पुस्तक घेऊन आले. मी आई बाबांकडे बघितलं. बाबांनी डोळ्यांनीच 'काही बोलू नको. बघ फक्त.म्हणून खुणावलं. मी गप्प बसून बघत होतो. बाबासाहेबांनी त्या पुस्तकावर काहीतरी लिहिलंआणि म्हणाले, "बाळराजेइकडे या." मी त्यांच्याजवळ दबकत गेलो. 'राजश्री धनंजयराव मेहेंदळे यांस शुभाशीर्वाद पूर्वक सादर !असं लिहून त्यांनी मला त्यांचं 'महाराजहे पुस्तक भेट दिलं. मी एकदम भारावून गेलो. त्यांना नमस्कार केला. 

'शेलारखिंड' या कादंबरीची एक प्रत बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना पूर्वी दिली होती, तीही आहे.

 

बाबासाहेबांना त्या दिवशी शस्त्र बघतांना मी हा किस्सा सांगितला. बाबासाहेब नेहमीसारखे प्रसन्न हसले. लहानपणच्या पहिल्या भेटीच्या वेळी जशी तलवार मला त्यांनी उचलायला दिली होतीत्यापेक्षा मोठी जड तलवार त्यांनी यावेळी मला उचलायला दिली होती. 

त्यानंतर त्यांनी चांदीचं सुंदर नक्षीकाम केलेल्या मुठीची छान तलवार दाखवली. त्याचबरोबर इतर काही तलवारीदांडप‍‍‍‍ट्टे दाखवले. बाबासाहेबांबरोबर अशाप्रकारे शस्त्र पाहण्याचा माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता.

काही वर्षांपूर्वी अंबरनाथ बाबासाहेबांची व्याख्यानमाला होतीमी आणि माझा मित्र योगेश कुलकर्णी त्याला जायचोतो पहिल्यांदाच बाबासाहेबांना ऐकत होता. बाबासाहेबांच्या धीरगंभीर आवाजात 'सा मां पातु सरस्वती भगवती...या सरस्वतीच्या आवाहनाने व्याख्यानाला सुरुवात झाली, आणि तिथेच तो स्तब्ध झाला. झपाटल्यासारखी ती व्याख्यानं ऐकली. शेवटच्या दिवशी रात्री व्याख्यान संपल्यावर भाऊकाकांना (खडकबाण) भेटलो. ते म्हणाले, "आता घरी चला. बाबासाहेब माझ्याकडेच मुक्कामाला आहेत. इथे गर्दी आहेतेव्हा घरी बाबासाहेबांशी निवांत भेट होईल."मग आम्हाला एका गाडीत बसवून घरी घेऊन गेलेआधी बाबासाहेबांचं व्याख्यान आणि नंतर भाऊकाकांमुळे बाबासाहेबांशी घडलेली भेटयामुळे योगेश अतिशय खुश झाला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची सावली आम्हाला दिसली, ते म्हणजे स्व. प्रतापरावदादा... बाबासाहेब जेवायला बसत होते. बाबासाहेबांच्या आवडी निवडी, पदार्थांची चव, त्यांना काय चालतं- काय नाही वगैरे सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांना होती. दादा काही पदार्थ चमच्याने थोडे हातावर घेऊन चाखत होते. तिखट मिठाचं योग्य प्रमाण पाहून, मगच बाबासाहेबांना ते स्वतः वाढत होते. इतक्या बारीकसारीक गोष्टींची ते काळजी घेत होते.

मला बाबासाहेबांबरोबर एकदा अगदी छोटा का असेनाप्रवास करण्याचं भाग्य लाभलं... प्रवास म्हणजे काय तरपर्वती ते विश्रामबाग वाडा...

साधारणपणे १७-१८ वर्षांपूर्वी असेल. सकाळी १० च्या सुमारास बाबासाहेबांच्या घरासमोरून जात होतो. दार उघडं दिसलं. आत गेलो. बाबासाहेब बेचैन वाटले. येरझाऱ्या मारत होते. म्हटलं, "बाबासाहेब काय झालं ?" म्हणाले, "११ वाजता विश्रामबाग वाड्यावर मिटींगसाठी जायचंय. दहा वाजून गेलेअजून कोणी आलं नाही. गाडीपण नाही." 

माझ्याकडे छोटी जुनी स्कूटी होती. त्याच्यावरून त्यांना घेऊन जावं का ? असा विचार मनात आलापण एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यावरून कसं घेऊन जायचं ? म्हणून मी काही बोललो नाही. त्यांना म्हटलं, "थांबारिक्षा आणतो."

ते म्हणाले, "थोडं थांबा. हा पेढा खा. तसेच निघू नका." बाबासाहेबांकडे इतकेवेळा गेलोयपण त्यांनी कधी मला (आणि सगळ्यांनाच) रिकाम्या हाताने पाठवलं नाही. अगदी चहा नाही देता आला तरीपेढावडी काहीतरी हातावर ठेवतातच. असो...

पटकन पेढा तोंडात टाकून बाहेर रिक्षा बघायला गेलो. घराबाहेर एकही रिक्षा उभी नव्हती. आणि ज्या येत जात होत्यात्याही भरलेल्या. 

बाबासाहेब बाहेर आले. म्हणाले, "तुम्ही कसे आलात ? म्हटलं छोटी स्कूटी आहे माझ्याकडे..." "चला मग जाऊ सोबत. तुम्हाला वेळ आहे ना?" मी म्हटलं, "मला चालेलपण तुम्ही यावर बसून याल?" (मी गाडीकडे बोट दाखवलं.) 

"छान आहे. वेळेच्या आधी पोहोचणं महत्वाचं. चला."

हे मात्र खरं आहे. कोणत्याही कार्यक्रमाला बाबासाहेब वेळेच्या आधी पोहोचतात आणि वेळेवरच कार्यक्रमाला सुरुवात करतात. ही त्यांची शिस्तच... 

बाबासाहेब गाडीवर डबलसीट बसले. म्हणाले, "आधी देवाला जाऊ. आमचं देवघर बघा." मग घराच्या मागे असलेल्या देवांना नमस्कार केला. तिथून विश्रामबाग वाड्यावर जायला निघालो.

एका मोठ्या व्यक्तीला आपल्या गाडीवरून आणि त्यातही छोट्या स्कूटीवरून डबलसीट घेऊन जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव. स्कूटीवरून त्यांना नेतांना थोडं दडपण आलेलं. कारण जेव्हा ज्या बाजूला वळायचं असेलतेव्हा बाबासाहेब त्या बाजूला झुकायचे. मला बॅलन्स जाऊन आम्ही पडतो की कायअसं वाटायचं. त्यांना सुखरूप वाड्यावर सोडणं महत्वाचं होतं. 

आम्ही जात असतांना अनेक लोक बाबासाहेबांना स्कूटीवर बसून जातांना बघूनआदराने आणि कौतुकाने थांबूनमागे वळून वळून बघत होते. मला खूप मजा वाटली. 

विश्रामबाग वाड्यावर त्यांना सुखरूप सोडलं. म्हटलं, "त्रास नाही ना झाला?" तर, "अजिबात नाही. तुमच्याबरोबर आल्यामुळे अगदी वेळेत पोहोचलो." त्याबद्दल आभार मानू लागले. आत येण्यासाठी आग्रह करू लागले. "संग्रहालय बघा. चहा घ्या" म्हणाले. 

आधीच मी त्यांना अशा जुन्या छोट्या गाडीवरून घेऊन गेलोयाबद्दल मला संकोचल्यासारखं वाटत होतंतर दुसरीकडे या मोठ्या माणसाबरोबर आपण आलो याचा प्रचंड आनंदही झाला होता.   

पण एक मात्र खरंएवढी मोठी सन्माननीय व्यक्ती असूनही (मानाने आणि वयानेही- त्यावेळी वय साधारणपणे ८०च्या आसपास) माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे बसून येतेत्यांच्या या साधेपणाने मी खूपच भारावून गेलो...

 पुन्हा एकदा आदरणीय श्री. बाबासाहेबांना 

९९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

 


Sunday, January 10, 2021

'जावा सम्राट' श्री. बबनराव दीक्षित

'जावा सम्राट' श्री. बबनराव दीक्षित

- धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे

मध्यंतरी 'जावा' या गेल्या पिढीतील गाडीचं भारतीय बाजारपेठेत पुनरागमन झालं. अनेक जुने 'जावा'प्रेमी आणि आजच्या पिढीतील अनेक तरुण या गाडीच्या येण्याची वाट बघत होते.

जुन्या जावा गाडया आजकाल पाहायला मिळणं, तसं अवघड आहे; पण पुण्यातील आमचे जावा संग्राहक मित्र श्री. बबनराव दीक्षित यांच्यामुळे जवळपास सत्तर वर्षांपूर्वीच्याही गाड्या बघायला मिळतात. केवळ जावाच नाही; तर इतर बनावटीच्या व्हीन्टेज दुचाकीही त्यांच्या संग्रहात आहेत.

स्वतःच्या गॅरेजचा व्याप सांभाळून बबनरावांनी आपला हा छंद जोपासला आहे. केवळ संग्रह करणंच नव्हे, तर या गाड्यांची खडानखडा माहिती असल्याने, गाडीचा एखादा पार्ट मिळत नसल्यास स्वतः तो पार्ट तयार करून घेतात.

त्यांचे चिरंजीव श्री. सुहास दादा हे ही या कामात निष्णात आहेत.

साधारणपणे 15 जावा, 10 इतर बनावटीच्या गाड्या असा जवळपास 25 व्हीन्टेज गाड्यांचा ताफा वयाच्या 80व्या वर्षीदेखील बबनराव उत्साहाने सांभाळतात.

एवढंच नाही, तर विंटेज रॅलीमध्ये त्यांच्या ताफ्यातल्या वेगवेगळ्या गाड्या चालवून दीक्षित पिता- पुत्र प्रथम क्रमांक मिळवणारच.

त्यांच्या या जावा प्रेमावर अनेक इंग्रजी- मराठी वृत्तपत्रात विविध लेख  छापून आले आहेत.

आता नवीन जावा लॉंचिंगच्या वेळी कंपनीने काढलेल्या खास पुस्तकातही त्यांची मुलाखत, फोटो छापले आहेत.

बबनराव, सुहास दादा यांच्याबरोबर आता तिसरी पिढीही (सुहास दादांची कन्या) यात तयार होत आहे.

बबनरावांसारख्या रसिक संग्राहकांमुळेच आमच्या आणि पुढच्या पिढीला हा दुर्मीळ खजाना पाहायला मिळतो...

सध्याचा कोविड काळ आणि वय 80... यामुळे बबनराव भेटू शकत नाहीत.

पण हा कोविडचा अवघड काळ सरल्यावर बबनराव पुन्हा आपल्या गाड्या घेऊन अवतरतील हे नक्की...

ही १९४७ सालातील जावा (Made in Czechoslovakia)

श्री. बबनराव आणि १९५१ मधील नव्याने पेंट केलेली जावा (Made in Czechoslovakia)







Thursday, July 4, 2019

आठवणीतल्या खिडक्या



आठवणीतल्या खिडक्या

‘खिडकी’... आता या विषयावर लिहिण्यासारखं ते काय ? असं तुम्हाला वाटेल; पण याच्या पलिकडेही एक वेगळं जग आहे... विविध रंगी... वेगवेगळ्या सुख- दु:खांनी व्यापलेलं... ही खिडकी आपल्याला बाहेरचं जग दाखवून खूप काही शिकवून जाते. एक चालता- बोलता सिनेमाच जणू... अशी अनेक चित्र- चलचित्र दाखवणाऱ्या खिडक्या मी पहिल्या आहेत... त्यातल्या काही विस्मरणात गेल्या, तर काही अगदी कायमच्या लक्षात राहील्या...
त्यातल्याच आमच्या जुन्या वाड्यातल्या घराच्या खिडक्या... खिडक्या कसल्या त्या,... रेल्वेच्या डब्ब्यांना असतात तशा लहान लहान चौकटीच... जमिनीपासून केवळ एखाद दीड फूटच उंचावर. त्या खिडक्यांचा आणि माझा अगदी लहानपणापासूनचा ऋणानुबंध... खूप गंमती- जमती पहिल्यात त्यातून... विशेषत: स्वयंपाकघराची खिडकी. या खिडकीशेजारच्या डायनिंग टेबलवर बसून मी जेवताना बाहेरची गंमत पाहात बसलेला असे. या खिडकीला लागून वाड्यात यायचा- जायचा रस्ता होता. लाल मातीचा. तिथून वाड्यात येणारे – जाणारे थांबून बोलायचे. वाड्यातल्या काकवा, आज्ज्या खिडकीत येऊन माझे गाल ओढत आणि आईला हाक मारत, अहो राजूच्या आई, आटोपलं का काम तुमचं ? या थोडावेळ बोलायला !” असं म्हणून गप्पा मारत उभ्या राहायच्या.
लहानपणी याच खिडकीत वाड्यातल्या मुलांना गोळा करून दुकान- दुकान खेळायचो. त्या खिडकीत सगळं दुकान मांडलेलं असायचं. दुकानाचा मालक अर्थात मीच.
पावसाळ्यात खिडकीबाहेरच्या लाल मातीच्या रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहायचे. मग खिडकीतूनच त्या पाण्यात कागदी होड्या सोडायचो. थोडं अंतर गेल्या की त्या बुडायच्या... कागदाच्याच त्या बुडणारच...
पूर्वी आमच्या घरी १०वी १२वीचे रिझल्ट यायचे. शाळा- कॉलेजच्या एक दिवस आधीच... दुपारी १२ वाजल्यापासूनच खिडकीपाशी प्रचंड गर्दी व्हायची. सगळे विद्यार्थी टेन्शनमध्ये मध्ये. माझे वडील दुपारी २-३ वाजेपर्यंत रिझल्ट घेऊन यायचे. ते आले की त्यांच्या रिक्षेभोवती मुलांचा गराडा पडे. त्यातून ते कसेबसे वाट काढत आत येऊन बसायचे. मुलांची तोपर्यंत ‘त्या’ खिडकीपाशी झुंबड उडालेली असायची. जे पास झालेत त्यांचे आनंदी आणि नापास झालेल्यांचे नाराज चेहेरे ‘त्या’ खिडकीने पहिले आहेत.

खिडकीसमोर एक गुजराती म्हातारी एकटीच राहायची. कोणी नव्हतं तिचं. तिच्याकडे येणारं- जाणारंपण कधी कोणी दिसलं नाही. त्यामुळे ती बिचारी कावळे, चिमण्या, कुत्रे, मांजरं, गायी यांना खायला घालून त्यांना जवळ करी. आम्हा वाड्यातल्या मुलांना तिचं घर म्हणजे कायमच एक गूढ वाटे. तिच्या घरात जायची कधी कोणाची हिंमत झाली नाही. आम्ही मुलं कधी दिसलो की, ती आम्हाला “ए बाबा छोकरा, अहिया आवो !” असं म्हणत बोलवायची. तरी आम्ही जायचो नाही. भीती वाटायची तिची. कारण ती म्हातारी दिसायला अगदी जादूच्या गोष्टीतल्या जख्खं चेटकिणीसारखी होती; पण मनाने ती खूप प्रेमळ. जेव्हापासून मी तिला पाहत होतो, तेव्हापासून ती एकटीच होती. ती गेली तेव्हाही... ती गेली तेव्हा आमची ती खिडकी तात्पुरती बंद झाली होती. मी ‘ते’ पाहुन घाबरू नये म्हणून... तिला नेल्यानंतर मगच खिडकी उघडली.
दुसऱ्या दिवशी तिचे कधीच न दिसलेले नातेवाईक आले आणि तिचं होतं नव्हतं ते सगळं समान घेऊन गेले... म्हातारीचं घर कायमचा बंद झालं... आणि तिची ती "ए बाबा छोकरा..." ही हाकसुद्धा...
काळ बदलत गेला, तशा खिडक्याही बदलत गेल्या... वाड्यातलं ते जुनं घर जाऊन त्या जागी आता नवी सोसायटी उभी राहिली. नव्या सोसायटीमधलं आमचं घर तळमजल्यावरच होतं. आता नव्या घराच्या नव्या खिडक्या... खिडकीपलीकडची आणि अलिकडची माणसं बदलली. खिडकीसमोरचं ते म्हातारीचं घरही आता राहिलं नाही. खिडकीतून आहो राजूच्या आई... अशी आपुलकीने हाक मारणाऱ्या आज्ज्या आणि काकवा एक एक करत जग सोडून गेल्या... त्यांची जागा आता समोरच्या बागेच्या कट्ट्यावर बसणाऱ्या 'सोसायटी'मधल्या आज्ज्या आणि काकवांनी घेतली... आणि आता राजूची आईपण राहिली नाही... स्वयंपाकघरातील तिच्या जागी आता राजूची बायको आली आहे. खिडकीबाहेरच्या लाल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या पाटाची जागा, आता सोसायटीच्या काँक्रीटच्या रस्त्याने घेतली. सगळंच चित्रं पालटलं...
कालांतराने मी सुद्धा ती जागा, ती खिडकी सोडली. पोटा-पाण्यासाठी नवीन शहरात आलो. एका जुन्या; पण देखण्या, मजबूत वाड्यात राहायला लागलो. इथली खिडकी पहिल्या मजल्यावर होती. आधीच्या खिडकीच्या दुप्पट - तिप्पट मोठी... भरभक्कम... खाली लाल मातीच्या रस्त्याऐवजी पक्का डांबरी रस्ता होता. तिथून सतत वाहनांची आणि माणसांची वर्दळ, गोंगाट, धूळ, वाहनांचा धूर... या खिडकीला लागूनच माझी कॉट होती. जेव्हा मी घरी असायचो, तेव्हा या खिडकीतल्या कॉटवर बसून खाली रस्त्यावरची गंमत पाहायचो. समोरच एक गॅरेज होतं; त्यामुळे वाहनांचा सततचा राबता. गिऱ्हाईकांनी गॅरेज मालकाबरोबर हुज्जत घालणं, गॅरेज मालकाने आपलं म्हणणं गिऱ्हाईकाला मोठमोठ्या आवाजात पटवून देणं आणि गिऱ्हाईकाला ते पटलं की, गळ्यातून काढलेल्या विशिष्ट प्रकारच्या मोठ्या घोगऱ्या आवाजात हा$$$$$$....!!!! असा त्याचा होकारयुक्त सुस्कारा दिवसातून अनेकवेळा ऐकलाय. त्या गॅरेजवाल्याचा सकाळी सुरू झालेला तोंडाचा पट्टा, रात्री गॅरेज बंद झाल्यावरच थांबायचा.
खिडकीखालच्या मजल्यावर एक वेडा माणूस राहायचा. दिवसभर तो त्या गॅरेजवाल्याला आणि रस्त्यावरच्या येणाऱ्या- जाणाऱ्याला मोठ्याने उगाचच शिव्या घालायचा आणि मग लोक त्यालाच शिव्या घालायचे. सगळीच गंमत होती.
हा खिडकीखालचा रस्ता एकेरी वाहतुकीचा होतं. मग महिना अखेरीस कडकीच्यावेळी मामा लोक गल्लीत दबा धरून, सावज हेरत बसलेले असायचे. एखादा नो एन्ट्रीमधून आला की, तो पकडला जायचा त्यांच्या जाळ्यात. शिवाय ट्रिपल सीट, लायसन्स नसलेले, फॅन्सी नंबर प्लेटवाले... सगळे एकामागोमाग एक जाळ्यात अडकायचे... सुट्टीच्या दिवशी मस्त टाईमपास असायचा.
तसंच ते खिडकीखालून ओरडत जाणारे फेरीवाले - भाजीवाले... प्रत्येक फेरीवाल्याची ओरडण्याची पद्धतच निराळी... मजेशीर...
ऑफिसमधून यायला बरेचदा रात्री उशीर व्हायचा, तेव्हा समोरच्या वाड्याच्या खिडकीत एक दमेकरी माणूस बराचवेळ डोकं धरून उभा असलेला दिसायचा... पुतळ्यासारखा...
कधी कधी सकाळी वासुदेव, तर कधी भल्या पहाटे खणखणीत आवाजात मनाचे श्लोक म्हणणारे रामदासी बुवा यायचे. प्रसन्न वाटायचं. पण रविवार सकाळी सकाळी येणारी ती कडकलक्ष्मी मात्र झोपेचं खोबरं करून जायची. एखाद्या रविवारी मस्त उशिरापर्यंत ताणून द्यावी असा विचार केला, की नेमकी ती सकाळी सात वाजताच हजर. तिच्या चाबकाच्या फटक्यांचा आवाज, कर्कश्श किंकाळी आणि हलगीवरचा तगडम तगडम आवाज भयंकर वाटायचा. खिडकी बंद केली, डोक्यावरून पांघरूण, उशी घेतली तरी तो आवाज काही कमी व्हायचा नाही...
या खिडकीने मला खूप वेगवेगळे लोक दाखवले. माणसांच्या विविध रंगी छटा पाहिल्या. त्यांचं वागणं- बोलणं न्याहाळता आलं. याच खिडकीने मला गणपती, नवरात्रीमधल्या आनंद- जल्लोषाच्या मिरवणुका दाखवल्या... तर कोणाच्या आयुष्याचा अखेरचा प्रवासही याच खिडकीने दाखवला...
गेली १० वर्ष मला सोबत करणारी ही खिडकी आता माझ्या सोबत नाही... तो वाडा- ती खिडकी जिथल्या तिथेच आहेत... पण मी आता तिथे नाही... आता नवीन ठिकाण, नवीन घर, नवीन खिडकी... पण या नवीन खिडकीतून काहीच वेगळं, नवीन दिसत नाही... त्यामुळे खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या बहुरंगी जगाकडे पाहण्याची सवय आता हळूहळू बंद होतेय की काय, असं वाटतं...


- धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे

Thursday, April 11, 2019

व्यवसाय आणि मनोवृत्ती


व्यवसाय आणि मनोवृत्ती
धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे

आज एका बऱ्यापैकी प्रसिद्ध अशा प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात गेलो होतो.बाहेर उन्हात खूप फिरूनही  त्या संस्थेचं प्रकाशन असलेलं एक पुस्तक कुठे मिळत नव्हतं, म्हणून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता मिळवून ते गाठलं. कार्यालयात दोनच कर्मचारी होते. तसे निवांतच. हवं ते पुस्तक मिळालं. पैसे दिले. 
तिथे आणखी काही पुस्तकं मांडलेली होती. वाचनाची बऱ्यापैकी आवड असल्याने पावलं आपोआपच तिकडे वळली. पुस्तकं विकत घेण्याच्या दृष्टीने बघू लागलो. दोन पुस्तकं घेतली, तेवढ्यात एक कर्मचारी आला.
म्हणाला, "साहेब आता लंचटाईम झालाय, नंतर या." 
म्हटलं, "ही पुस्तकं घ्यायची आहेत." 
तर तो म्हणे, "नंतर या." 
मी आधी शोधत होतो, ते पुस्तक चांगलं महाग होतं. आणि ही दोन पुस्तकं सुद्धा किरकोळ नव्हती.
'ठिक आहे' म्हणून मी तिथून निघालो. दाराबाहेर काढलेल्या चपला घालत असतांनाच, तो कर्मचारी आला आणि धाडकन दार लावून घेतलं. 

याआधी घडलेला असाच एक प्रसंग...
कामं आटपून रात्री 10 वाजता घरी येत असतांना, घराजवळच्या एका स्टेशनरीच्या दुकानात गेलो. 
'दुकान उघडं होतं.' दुकानदार आत कॉम्प्युटरवर काहीतरी करत होता. काय हवंय, ते त्याला सांगितलं. तर तो अनुनासिक स्वरात उर्मटपणे म्हणाला, "दुकान बंद झालंय." 
मी, "ऑ, दुकान तर उघडं दिसतंय मला, म्हणून आलो."
दुकानदार, "नाही नाही, व्यवहाराची वेळ संपली. उद्या या." (मनातल्या मनात) त्याला शिव्या घालत तिथून निघालो. म्हटलं अवघड आहे.

पण या उलट एका राजस्थानी माणसाच्या दुकानात वेगळा अनुभव आला.
उन्हाळा असल्याने, रात्री आइस्क्रीम घेण्यासाठी त्या दुकानात गेलो.
दुकानाला कुलूप लावून तो निघत होता. मी तिथे गेलो, तर त्याने अदबीनं 'काही हवंय का' विचारलं. 
म्हटलं, "फक्त आइस्क्रीम हवं होतं; पण राहू दे. बंद केलंय ना दुकान."
तर तो म्हणे, "एवढंच ना, देतो की." असं म्हणत, माझ्या पुढच्या बोलण्याची वाट न पाहता, दुकान पुन्हा उघडायला लागला. मोठ्या साखळीने कुलूप लावलेलं दुकान उघडलं. डीप फ्रीजचं कुलूप उघडून मला म्हणाला, "या, हवं ते घ्या."
त्याला त्या 'कडेकोट बंदोबस्तातील' दुकान उघडायला लावल्याने मला थोडं awkward वाटलं आणि त्याचं कौतुकही...
त्याला धन्यवाद दिले. म्हटलं, "माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला."
दुकानदार, "कुलूप उघडण्याचा कसला त्रास, उलट माझा धंदा झाला. मला चार पैसे जास्त मिळाल्याचं समाधान आणि तुम्हाला हवं ते मिळाल्याचं समाधान..."

आधीचे दोन अनुभव आणि हा अनुभव. दोघेही व्यावसायिक; परंतु मनोवृत्ती भिन्न...