Thursday, July 4, 2019

आठवणीतल्या खिडक्या



आठवणीतल्या खिडक्या

‘खिडकी’... आता या विषयावर लिहिण्यासारखं ते काय ? असं तुम्हाला वाटेल; पण याच्या पलिकडेही एक वेगळं जग आहे... विविध रंगी... वेगवेगळ्या सुख- दु:खांनी व्यापलेलं... ही खिडकी आपल्याला बाहेरचं जग दाखवून खूप काही शिकवून जाते. एक चालता- बोलता सिनेमाच जणू... अशी अनेक चित्र- चलचित्र दाखवणाऱ्या खिडक्या मी पहिल्या आहेत... त्यातल्या काही विस्मरणात गेल्या, तर काही अगदी कायमच्या लक्षात राहील्या...
त्यातल्याच आमच्या जुन्या वाड्यातल्या घराच्या खिडक्या... खिडक्या कसल्या त्या,... रेल्वेच्या डब्ब्यांना असतात तशा लहान लहान चौकटीच... जमिनीपासून केवळ एखाद दीड फूटच उंचावर. त्या खिडक्यांचा आणि माझा अगदी लहानपणापासूनचा ऋणानुबंध... खूप गंमती- जमती पहिल्यात त्यातून... विशेषत: स्वयंपाकघराची खिडकी. या खिडकीशेजारच्या डायनिंग टेबलवर बसून मी जेवताना बाहेरची गंमत पाहात बसलेला असे. या खिडकीला लागून वाड्यात यायचा- जायचा रस्ता होता. लाल मातीचा. तिथून वाड्यात येणारे – जाणारे थांबून बोलायचे. वाड्यातल्या काकवा, आज्ज्या खिडकीत येऊन माझे गाल ओढत आणि आईला हाक मारत, अहो राजूच्या आई, आटोपलं का काम तुमचं ? या थोडावेळ बोलायला !” असं म्हणून गप्पा मारत उभ्या राहायच्या.
लहानपणी याच खिडकीत वाड्यातल्या मुलांना गोळा करून दुकान- दुकान खेळायचो. त्या खिडकीत सगळं दुकान मांडलेलं असायचं. दुकानाचा मालक अर्थात मीच.
पावसाळ्यात खिडकीबाहेरच्या लाल मातीच्या रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहायचे. मग खिडकीतूनच त्या पाण्यात कागदी होड्या सोडायचो. थोडं अंतर गेल्या की त्या बुडायच्या... कागदाच्याच त्या बुडणारच...
पूर्वी आमच्या घरी १०वी १२वीचे रिझल्ट यायचे. शाळा- कॉलेजच्या एक दिवस आधीच... दुपारी १२ वाजल्यापासूनच खिडकीपाशी प्रचंड गर्दी व्हायची. सगळे विद्यार्थी टेन्शनमध्ये मध्ये. माझे वडील दुपारी २-३ वाजेपर्यंत रिझल्ट घेऊन यायचे. ते आले की त्यांच्या रिक्षेभोवती मुलांचा गराडा पडे. त्यातून ते कसेबसे वाट काढत आत येऊन बसायचे. मुलांची तोपर्यंत ‘त्या’ खिडकीपाशी झुंबड उडालेली असायची. जे पास झालेत त्यांचे आनंदी आणि नापास झालेल्यांचे नाराज चेहेरे ‘त्या’ खिडकीने पहिले आहेत.

खिडकीसमोर एक गुजराती म्हातारी एकटीच राहायची. कोणी नव्हतं तिचं. तिच्याकडे येणारं- जाणारंपण कधी कोणी दिसलं नाही. त्यामुळे ती बिचारी कावळे, चिमण्या, कुत्रे, मांजरं, गायी यांना खायला घालून त्यांना जवळ करी. आम्हा वाड्यातल्या मुलांना तिचं घर म्हणजे कायमच एक गूढ वाटे. तिच्या घरात जायची कधी कोणाची हिंमत झाली नाही. आम्ही मुलं कधी दिसलो की, ती आम्हाला “ए बाबा छोकरा, अहिया आवो !” असं म्हणत बोलवायची. तरी आम्ही जायचो नाही. भीती वाटायची तिची. कारण ती म्हातारी दिसायला अगदी जादूच्या गोष्टीतल्या जख्खं चेटकिणीसारखी होती; पण मनाने ती खूप प्रेमळ. जेव्हापासून मी तिला पाहत होतो, तेव्हापासून ती एकटीच होती. ती गेली तेव्हाही... ती गेली तेव्हा आमची ती खिडकी तात्पुरती बंद झाली होती. मी ‘ते’ पाहुन घाबरू नये म्हणून... तिला नेल्यानंतर मगच खिडकी उघडली.
दुसऱ्या दिवशी तिचे कधीच न दिसलेले नातेवाईक आले आणि तिचं होतं नव्हतं ते सगळं समान घेऊन गेले... म्हातारीचं घर कायमचा बंद झालं... आणि तिची ती "ए बाबा छोकरा..." ही हाकसुद्धा...
काळ बदलत गेला, तशा खिडक्याही बदलत गेल्या... वाड्यातलं ते जुनं घर जाऊन त्या जागी आता नवी सोसायटी उभी राहिली. नव्या सोसायटीमधलं आमचं घर तळमजल्यावरच होतं. आता नव्या घराच्या नव्या खिडक्या... खिडकीपलीकडची आणि अलिकडची माणसं बदलली. खिडकीसमोरचं ते म्हातारीचं घरही आता राहिलं नाही. खिडकीतून आहो राजूच्या आई... अशी आपुलकीने हाक मारणाऱ्या आज्ज्या आणि काकवा एक एक करत जग सोडून गेल्या... त्यांची जागा आता समोरच्या बागेच्या कट्ट्यावर बसणाऱ्या 'सोसायटी'मधल्या आज्ज्या आणि काकवांनी घेतली... आणि आता राजूची आईपण राहिली नाही... स्वयंपाकघरातील तिच्या जागी आता राजूची बायको आली आहे. खिडकीबाहेरच्या लाल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या पाटाची जागा, आता सोसायटीच्या काँक्रीटच्या रस्त्याने घेतली. सगळंच चित्रं पालटलं...
कालांतराने मी सुद्धा ती जागा, ती खिडकी सोडली. पोटा-पाण्यासाठी नवीन शहरात आलो. एका जुन्या; पण देखण्या, मजबूत वाड्यात राहायला लागलो. इथली खिडकी पहिल्या मजल्यावर होती. आधीच्या खिडकीच्या दुप्पट - तिप्पट मोठी... भरभक्कम... खाली लाल मातीच्या रस्त्याऐवजी पक्का डांबरी रस्ता होता. तिथून सतत वाहनांची आणि माणसांची वर्दळ, गोंगाट, धूळ, वाहनांचा धूर... या खिडकीला लागूनच माझी कॉट होती. जेव्हा मी घरी असायचो, तेव्हा या खिडकीतल्या कॉटवर बसून खाली रस्त्यावरची गंमत पाहायचो. समोरच एक गॅरेज होतं; त्यामुळे वाहनांचा सततचा राबता. गिऱ्हाईकांनी गॅरेज मालकाबरोबर हुज्जत घालणं, गॅरेज मालकाने आपलं म्हणणं गिऱ्हाईकाला मोठमोठ्या आवाजात पटवून देणं आणि गिऱ्हाईकाला ते पटलं की, गळ्यातून काढलेल्या विशिष्ट प्रकारच्या मोठ्या घोगऱ्या आवाजात हा$$$$$$....!!!! असा त्याचा होकारयुक्त सुस्कारा दिवसातून अनेकवेळा ऐकलाय. त्या गॅरेजवाल्याचा सकाळी सुरू झालेला तोंडाचा पट्टा, रात्री गॅरेज बंद झाल्यावरच थांबायचा.
खिडकीखालच्या मजल्यावर एक वेडा माणूस राहायचा. दिवसभर तो त्या गॅरेजवाल्याला आणि रस्त्यावरच्या येणाऱ्या- जाणाऱ्याला मोठ्याने उगाचच शिव्या घालायचा आणि मग लोक त्यालाच शिव्या घालायचे. सगळीच गंमत होती.
हा खिडकीखालचा रस्ता एकेरी वाहतुकीचा होतं. मग महिना अखेरीस कडकीच्यावेळी मामा लोक गल्लीत दबा धरून, सावज हेरत बसलेले असायचे. एखादा नो एन्ट्रीमधून आला की, तो पकडला जायचा त्यांच्या जाळ्यात. शिवाय ट्रिपल सीट, लायसन्स नसलेले, फॅन्सी नंबर प्लेटवाले... सगळे एकामागोमाग एक जाळ्यात अडकायचे... सुट्टीच्या दिवशी मस्त टाईमपास असायचा.
तसंच ते खिडकीखालून ओरडत जाणारे फेरीवाले - भाजीवाले... प्रत्येक फेरीवाल्याची ओरडण्याची पद्धतच निराळी... मजेशीर...
ऑफिसमधून यायला बरेचदा रात्री उशीर व्हायचा, तेव्हा समोरच्या वाड्याच्या खिडकीत एक दमेकरी माणूस बराचवेळ डोकं धरून उभा असलेला दिसायचा... पुतळ्यासारखा...
कधी कधी सकाळी वासुदेव, तर कधी भल्या पहाटे खणखणीत आवाजात मनाचे श्लोक म्हणणारे रामदासी बुवा यायचे. प्रसन्न वाटायचं. पण रविवार सकाळी सकाळी येणारी ती कडकलक्ष्मी मात्र झोपेचं खोबरं करून जायची. एखाद्या रविवारी मस्त उशिरापर्यंत ताणून द्यावी असा विचार केला, की नेमकी ती सकाळी सात वाजताच हजर. तिच्या चाबकाच्या फटक्यांचा आवाज, कर्कश्श किंकाळी आणि हलगीवरचा तगडम तगडम आवाज भयंकर वाटायचा. खिडकी बंद केली, डोक्यावरून पांघरूण, उशी घेतली तरी तो आवाज काही कमी व्हायचा नाही...
या खिडकीने मला खूप वेगवेगळे लोक दाखवले. माणसांच्या विविध रंगी छटा पाहिल्या. त्यांचं वागणं- बोलणं न्याहाळता आलं. याच खिडकीने मला गणपती, नवरात्रीमधल्या आनंद- जल्लोषाच्या मिरवणुका दाखवल्या... तर कोणाच्या आयुष्याचा अखेरचा प्रवासही याच खिडकीने दाखवला...
गेली १० वर्ष मला सोबत करणारी ही खिडकी आता माझ्या सोबत नाही... तो वाडा- ती खिडकी जिथल्या तिथेच आहेत... पण मी आता तिथे नाही... आता नवीन ठिकाण, नवीन घर, नवीन खिडकी... पण या नवीन खिडकीतून काहीच वेगळं, नवीन दिसत नाही... त्यामुळे खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या बहुरंगी जगाकडे पाहण्याची सवय आता हळूहळू बंद होतेय की काय, असं वाटतं...


- धनंजय वसंत मेहेंदळे, पुणे

4 comments:

  1. Khup Chaan... Lahanpanicha Sarva athawani Tajya zalya

    ReplyDelete
  2. लिखाण साधं सोपं परंतु मनाला भावणार आहे. असंच लिहित रहा आणि पुढिल वाटचालीसाठि खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete